Monday, January 1, 2018

बिटकॉईन व क्रिप्टोकरन्सी
------------------------------------------------------
काळाच्या कसोटीवर खरे उतरेल की नाही याबाबत जरी प्रचंड शासंकता असली, तरी या जाळ्यात (चांगले की वाईट येणारा काळ ठरवेल) लाखो ओढले जात आहेत. यामागे कोणती यंत्रणा काम करते आहे याबाबत चित्र अजून स्पष्ट व्हायचे आहे. २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या प्रवाहात क्रिप्टो करन्सी नावाचा एक प्रकार अलिकडे उदयास आला आहे. याला मोहाला बळी पडणे, या वाक्यप्रचाराचा दुसरा गोंडस अर्थ म्हणजे सर्वात आधी ती गोष्ट मिळवणे असा आहे. नवीन तंत्रज्ञान, नवे बदल, नवे परिवर्तन हे गरजेचे असते, मात्र ते करताना आपल्या जगण्याचा उद्देश हरवून जाऊ नये ही काळजी माणूस म्हणून प्रत्येकाने घेतली पाहिजे. क्रिप्टो करन्सीला येणाऱ्या काळात अतिशय चांगले दिवस येतील, मात्र हे खात्रीशीर सांगणे अवघड आहे.

अर्थशास्त्राच्या, बाजाराच्या व बँकेच्या नियमानुसार सुरवातीला धूळ खात पडलेली संकल्पना एका टप्प्यावर काही लोक वापरायला सुरवात करतात. तेव्हा त्यांना लाभ होत असल्याने लोक मोठ्या आकर्षित व्हायला सुरवात होते. त्याचवेळी या लोकांना अधिक वेगाने फायदा मिळायला सुरवात होते. ही त्या संकल्पनेची growth phase (वेगवान वाढीची अवस्था) असते. त्यानंतर saturation phase (स्थैर्यावस्था) येते. इथे मिळणारे लाभ अतिशय कमी होतात. त्यानंतर त्या संकल्पनेची उतारावस्था (decline phase) सुरु होते. सर्व संकल्पनाच्या बाबतीत होते, तसेच ते क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत होईल. 2008 ते 2010 च्या दरम्यान सोन्याचे भाव अतिशय वेगाने वाढत होते. तो काळ जागतिक मंदीचा होता, त्यामुळे लोकांनी सुरक्षित गुंतवणुकीचा गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सोने खरेदी सुरु केली. मार्केटमधील सोन्याची मागणी पुरवठ्याच्या तुलनेत वाढली. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 2004 च्या दरम्यान 5000 रुपये तोळ्याने मिळणारे सोने हे 2011 च्या शेवटी 33000 रुपये तोळा भावाने विकले जाऊ लागले. तोपर्यंत बऱ्यापैकी लोकांनी सोने खरेदी करुन ठेवले असल्याने लोकांची सोने खरेदी क्षमता संपली किंवा कमी झाली. त्यामुळे सोन्याची मार्केटमधली मागणी कमी झाली. त्यानंतर आजपर्यंत सोन्याच्या भावात वाढ झाली नाही. उलट ते भाव उतरुन 25 ते 30 हजाराच्या घरात स्थिरावले आहेत.


हीच बाब रिअल इस्टेट मध्ये सुध्दा अशाच पध्दतीने घडून आली. मुंबई किंवा तत्सम वेगाने वाढणाऱ्या शहरात 1990-95 च्या काळात ज्यांनी घरे खरेदी केली त्यांच्या घराच्या किंमती 8 ते 10 वर्षात दुप्पट तिप्पट झाल्या. त्यानंतर पुढील 10 वर्षात त्या किंमती त्याच गतीने वाढत गेल्या. होम लोन अर्थात गृहकर्जे वगैरेची बाजारात चलती निर्माण झाली. राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांनी करोडो रुपये गृहकर्जाच्या जाहिरातीवर उधळले, कारण लोकांच्या पगारातील जवळपास दोन तृतीयांश पगार बँकाकडे येऊ लागला होता. त्यानंतर या किंमती एवढ्या वाढत गेल्या की, खरेदी करणाराच्या आवाक्याबाहेर गेल्या. आता रिअल इस्टेट मध्ये या किंमती स्थिरावल्या आहेत. इतर (तालुका, किंवा निमशहरी जिल्हा) ठिकाणच्या रिअल इस्टेट मध्ये अजून काही वर्षाने हे चित्र दिसेल. हे क्षेत्र तिथे सध्या वेगवान वाढीच्या अवस्थेत आहे.


हीच बाब क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत येणाऱ्या काळात होणार आहे. मात्र याला चालवणारे जर काही लोक जर विध्वसंक किंवा घोटाळेबाज प्रवृत्तीचे असतील तर अमेरिकन बँक क्षेत्रातल्या लेहमन ब्रदर्स सारखी अवस्था होऊन गुंतवणूकदारांची चांगलीच फसवणूक होणार आहे. येणाऱ्या काळात हे चित्र स्पष्ट होईल. सध्या या करन्सीचे मार्केटिंग करणारे लोक भारत सरकारने ही करन्सी अधिकृत केली आहे असे कितीही ओरडून सांगत असले, तरी याला तसा काही कायदेशीर आधार नाही. रिझर्व बँकेने आणि अर्थमंत्रालयाने जीआर काढून क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करु नका असा आदेश भारतीय नागरिकांना दिला आहे. त्यामुळे जर फसवणूक झाली तर न्याय मागायला कुठे जाणार? या प्रश्नाचा विचार या गुंतवणुकदारांना केलेला नाही.


वेगाने वाढत असलेल्या त्यांच्या किंमतीच्या आकर्षणाला बळी पडण्याचा मोह किंवा त्यातून मिळणारे लाभ टाळण्याचा त्याग लोकांच्या बुध्दीला स्वस्थ बसू देत नसतो. त्यांच्या बुध्दीसाठी एक उदाहरण पाहू या. क्रिप्टो करन्सी मध्ये केलेली गुंतवणूक ही आपल्या आयुष्यातली सगळी गुंतवणूक मोडून करू नये किंवा कर्ज काढून, घरदार जमीन विकून, दागिने गहाण टाकून ही गुंतवणूक करण्याची चूक येणाऱ्या काळात महाग पडू शकते. आपल्या नियमित जगण्यावर त्याचा परिणाम होणार नाही, अशी रक्कम या करन्सी मध्ये गुंतवून त्याचा लाभ करुन घ्यायला काहीच हरकत नाही. एक गोष्ट मात्र सत्य आहे की, हे परिवर्तन जर समजा आज ना उद्या (कदाचित) प्रत्येकालाच क्रिप्टो करन्सी स्वीकारावी लागली, तर (लागू शकते) ती प्रत्येकाच्या आवाक्यात येईल. त्यामुळे आपण जगाच्या मागे पडू किंवा जगाच्या मागे आहोत वगैरे गैरसमज डोक्यातून हद्दपार केलेले चांगले होईल.


ते उदाहरण आहे, टेलिकॉम जगतातील. भारतात पहिल्यांदा सर्वत्र मोबाईल येऊन फार वर्षांचा कालावधी लोटलेला नाही. जेव्हा हे मोबाईल मार्केटमध्ये नवीन दिसू लागले. तेव्हा काही ठराविक लोकांकडेच मोबाईल असायचे. त्यात आताच्या मोबाईलच्या 2 टक्के सुध्दा वैशिष्टे नव्हती. त्यासाठी त्यांनी आताच्या मोबाईल पेक्षा कितीतरी अधिक किंमत त्यावेळी दिली होती. अर्थात त्याचा लाभ त्यांना त्याकाळात घेता आलाच. एसटीडी कॉल वगैरे साठी एका मिनिटासाठी साडेतीन रुपये लागायचे. इनकमिंगला सुध्दा पैसे लागत होते. सिमकार्डची वैधता वाढवून घेण्यासाठी सुध्दा पैसे लागत होते. आता मोबाईल सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्यानंतर त्यांना मागे पडल्याचा भास होत नाही, कारण ते मागे पडलेले नाहीत. एखादी संकल्पना व्यवहाराच्या पातळीवर प्रत्येकाला स्वीकारावी लागते, तेव्हा प्रत्येकाच्या आवाक्यात येते. कुणी मागे वगैरे पडत नाही. क्रिप्टो करन्सीला चांगले भवितव्य लाभावे हीच अपेक्षा आहे. त्यामुळे एक नवे परिवर्तन होईल, मात्र त्यासाठी आज फार चिंता करण्याची गरज नाही.


ज्यांना त्यातून प्रचंड पैसे कमावयाचे असतील त्यांनी त्यासाठी रिस्क घ्यायला काहीच हरकत नाही, मात्र ती स्वतःच्या जबाबदारीवर घ्यावी. क्यूंकि डर आगे जीत है।

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती.
टीप - बिटकॉईन व क्रिप्टोकरन्सी बद्दल मार्केट मध्ये उडालेला गोंधळ दूर करण्यासाठी हा लेख देत आहोत...